महाराष्ट्रराजकीय

सुनेत्रा पवार देणार घड्याळाला गती, आमदारांशी वन टू वन चर्चा


ऋतुजा बालवडकर, मुख्य संपादक

मुंबई -अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आले आहेत. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले केले असून, ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी मंगळवारी होणाऱ्या बैठकीत त्या प्रत्येक आमदाराशी ‘वन टू वन’ चर्चा करणार आहेत.

प्रामुख्याने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आमदारांची नेमकी मते काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी ही महत्त्वाची बैठक होत असल्याचे समजते.

पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी या बैठकीच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, सुनेत्रा पवार या आमदारांशी थेट संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याची भावना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली होती. पुसदचे आमदार आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, “कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नेतृत्वाने सल्लामसलत करणे गरजेचे आहे. हा निर्णय सामूहिक असावा आणि आम्ही आमची मते नेतृत्वाकडे स्पष्टपणे मांडू.”

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी तर विलीनीकरणाच्या बाजूने उघड भूमिका घेतली आहे. “पक्षातील ४० पैकी ३५ आमदार विलीनीकरणाच्या बाजूने आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे, हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र यासंदर्भात सावध पवित्रा घेतला आहे. “सध्या प्राधान्य हे सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मजबूत करण्याला आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याला दिले जात आहे. विलीनीकरणाचा निर्णय सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून असेल, मात्र तो विषय अध्यक्ष निवडीनंतरच घेतला जाईल,” असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले आहे. “पक्षांतर्गत विलीनीकरणावर यापुढे कोणतीही चर्चा होणार नाही आणि कोणताही नेता यावर जाहीरपणे बोलणार नाही,” असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *