फॅशन

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुण गंभीर जखमी : धोंडगाव नजीक नाल्याजवळ भीषण अपघात


भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुण गंभीर जखमी : धोंडगाव नजीक नाल्याजवळ भीषण अपघात

समुद्रपूर : प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात उमरेड–हिंगणघाट राज्यमार्ग क्र. ३२६ वर धोंडगाव नजीक नाल्याजवळ भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने समुद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण चौधरी व हर्षल धोटे हे दोघे स्प्लेंडर दुचाकीवरून जामकडे जात होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या MH 46 AV 3040 क्रमांकाच्या कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोन्ही तरुण हवेत उडून काही अंतरावर जाऊन पडले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठी गर्दी जमल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.

घटनेची माहिती मिळताच गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार विकास गायकवाड, चालक दत्ता मोरे तसेच पोलीस कर्मचारी संदीप गावंडे, सचिन ठाकरे, दिलीप वंदिले आणि पत्रकार यश राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कार चालक पळून गेला होता; मात्र पोलिसांनी समुद्रपूर येथे त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवले.

कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याने मद्यप्राशन केले होते का, याबाबतही तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गिरड पोलीस स्टेशन करीत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *